भोसले VS मोहिते! कृष्णाचा गड कोण सर करणार?

भोसले VS मोहिते! कृष्णाचा गड कोण सर करणार?
पोल पंडित संस्थेचा ओपिनियन पोल
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनल आणि कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनल या दोन्ही पॅनलचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे सुरुवातीला एकर्तफी वाटणारी ही निवडक रंजक झाल्याची चर्चा सभासदांमध्ये दिसून येते. अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वात उभा करण्यात आलेल्या संस्थापक पॅनल खरचं सुरेश बाबा भोसले यांच्या सहकार पॅनलसमोर तगडं आव्हान निर्माण करु शकेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पोल पंडित संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले.
मोफत साखर, निम्मी पाणीपट्टी; पण गणिते चुकली?
पोल पंडित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार याआधी आम्ही सांगितल्याप्रमाणे निवडणूक प्रचार वाढती पाणीपट्टी आणि साखरेच्या गुणवत्तेवर केंद्रित असल्याचे दिसून येत आहे. संस्थापक पॅनलने प्रत्येक सभासदांना १२० किलो साखर मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासोबतच पाणीपट्टी १५ हजारांवरून थेट साडेसात हजार करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्हाला सर्वेक्षणादरम्यान असे आढळून आले की, पाणीपट्टी हा मुद्दा असला तरी संस्थापक पॅनलने दिलेल्या आश्नासनावर सभासद शंका उपस्थित करताना दिसून येतात. सभासदांच्या मते इरिगिशन यंत्रणा पूर्णपणे जुनी झालेली आहे. संस्थापक पॅनलने दिलेल्या आश्वासनानुसार साडे सात हजार रुपये पाणी पट्टीवर ही यंत्रणा चालू ठेवणे शक्य नाही. त्यामुळे या मुद्यावर संस्थापक पॅनलला जी आघाडी अपेक्षित होती ती मिळताना दिसून येत नाही.
उंडाळकरांचा भोसलेंना पाठिंबा; 'कराड'मध्ये समीकरणं बदलली!
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही फक्त मुद्यांवरच नाहीतर येतील राजकीय गट तट आणि समिकरणांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. कारखान्याचे २८ हजार सभासद हे एकट्या कराड तालुक्यातील आहेत. या भागात भोसले, उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा गट सक्रिय दिसून येतो. पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत अद्याप थेट भूमिका घेतलेली नाही. परंतु चव्हाण गटाचे समर्थक हे अविनाश मोहिते यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून येतात. याउलट कराड तालुक्यात मोठा राजकीय प्रभाव असलेल्या उंडाळकर गटाने भोसले गटाच्या सहकार पॅनलला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे कराड तालुक्यात सद्यस्थितीत सहकार पॅनलने मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येते.
वाळव्याच्या १४ हजार सभासदांचा कौल कोणाला?
कराड नंतर वाळवा तालुक्यात कारखान्याचे अंदाजे १४ हजार सभासद आहेत. या भागात जयंत पाटील यांची भूमिका कायमच निर्णायक ठरते. परंतु यावेळी जयंत पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. दोन्ही पॅनल त्यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर सभेत सांगत आहेत. परंतु जयंत पाटील यांनी उघडपणे कोणतीही भूमिका घेतलेली नाही. पाटील गटासोबतच वाळवा तालुक्यात सम्राट महाडिक आणि निशिकांत भोसले यांचाही गट सक्रिय आहे. या दोन्ही गटाने सहकार पॅनलला पाठिंबा दिलेला आहे. परंतु महाडिक गटाचा सहकार पॅनलमध्ये उमेदवार नसल्यामुळे महाडिक गट नाराज असल्याच्या चर्चा दिसून येतात. वाळवा तालुक्यातील गटातटाचे राजकारण बाजूला ठेवले तरी कराड तालुक्याच्या तुलनेत वाळवा तालुक्यात मोहिते गटाच्या संस्थापक पॅनलला चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. संस्थापक पॅनलने लावून धरलेला वाढीव पाणीपट्टीचा मुद्दा वाळवा तालुक्यात प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यात संस्थापक पॅनलला सभासदांचा चांगला पाठिंबा मिळेल अशी शक्यता दिसून येते.
पलूस-कडेगावमध्ये 'सहकार पॅनल' सरस
कराड आणि वाळवा तालुक्यानंतर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात कारखान्याचे अंदाजे पाच हजार सहाशे सभासद आहेत. या तालुक्यातील आमदार विश्वजीत कदम, विधान परिषदेचे आमदार अरूण लाड, भाजपा नेते पृथ्वीराज देशमुख आणि संग्राम देशमुख या सर्व नेत्यांनी सहकार पॅनलला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या तालुक्यातून सहकार पॅनलला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता दिसून येते.
त्यासोबतच कारखान्यातील कामगार सुद्धा मोठा प्रमाणात सभासद आहेत. कामगार हे सत्ताधारी असलेल्या सहकार पॅनलसोबतच असल्याचे दिसून येत आहे. ऐकूनच विचार केल्यास मोहिते यांचे संस्थापक पॅनल प्रचारात संपूर्ण ताकद लावत असले तरी पोल पंडित संस्थेच्या सर्वेक्षणानुसार कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आजघडीला भोसले गटाचे सहकार पॅनल आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
लेखक 'पोल पंडित' या निवडणूक सर्वेक्षण व संशोधन संस्थेत वरिष्ठ संशोधक आहेत.