कृष्णाकाठच्या सत्तासंघर्षात कोणाचे पारडे जड?
.jpeg)
१९६० च्या दशकात स्थापन झालेला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखाना हा सातारा आणि सांगली जिल्ह्यांसह पाच तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी जोडलेला आहे.
गेल्या चार दशकांपासून या कारखान्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोहिते आणि भोसले कुटुंबीयांमध्ये राजकीय संघर्ष सातत्याने पाहायला मिळतो. यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले यांच्यापासून सुरू झालेला हा संघर्ष आता आमदार अतुल भोसले आणि माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या पिढीत पोहोचला आहे. यंदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू होताच दोन्ही गट मोर्चेबांधणीला लागले आहेत. वरकरणी भोसले गट मजबूत दिसत असला तरी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकांचा इतिहास पाहता शेवटच्या टप्प्यात समीकरणे बदलण्याची शक्यता कायम राहिली आहे. वरवर सोपी वाटणारी ही लढत शेवटच्या क्षणी काय वळण घेणार? ( इथे क्लिक करून विश्लेषण विडियो च्या माध्यमातून पहा )
स्वपक्षीय, विरोधक आणि राजकीय समीकरणांची कसरत
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कराड आणि वाळवा तालुक्याचे सर्वाधिक महत्त्व आहे. कराड तालुक्यातील २८ हजार सभासदांवर भोसले कुटुंबीयांचा प्रभाव मानला जातो. भोसले कुटुंबीयांचे पारंपरिक विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कारखान्याच्या निवडणुकांपासून अलिप्त राहिले आहेत. तर दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनानंतर उंडाळकर गटाची सक्रियता कमी झालेली दिसते. यावेळी हा गट भोसले गटाला पाठिंबा देण्याची शक्यता चर्चेत आहे.
२०२१ मध्ये आमदार विश्वजीत कदम यांनी इंद्रजित मोहिते यांच्या माध्यमातून ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रयत पॅनलचा दारुण पराभव झाला. पलूस-कडेगाव भागातील ७ ते ८ हजार सभासद आणि १ ते २ संचालकांवर प्रभाव असल्याने विश्वजीत कदम यांची भूमिकाही महत्त्वाची मानली जाते. मात्र यशवंतराव मोहिते सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक अडचणींनंतर इंद्रजित मोहिते सक्रिय राजकारणापासून दूर गेल्याने समीकरणे बदलताना दिसत आहेत.
वाळवा तालुक्यातील सुमारे १५ हजार सभासद आणि ८ ते १० संचालकांमुळे हा तालुका निर्णायक ठरतो. आमदार जयंत पाटील, निशिकांत पाटील आणि सम्राट महाडिक यांचे स्वतंत्र गट स्थानिक पातळीवर विरोधात असले तरी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत भोसले गटाला पाठिंबा देण्यावर एकमत असल्याचे दिसते. मात्र या पाठिंब्यांच्या बदल्यात सत्तेतील वाटा द्यावा लागणार असल्याने उमेदवारी वाटपात भोसले गटाला मोठी तारेवरची कसरत करावी लागू शकते. स्वपक्षीय नाराजी आणि संभाव्य बंडखोरी हा त्यांच्यासमोरील मोठा धोका असू शकतो.
पाणीपट्टी, शेअर्स हस्तांतरण आणि सभासदांची नाराजी
मागील दशकात चेअरमन सुरेश भोसले यांनी कारखान्याची आर्थिक शिस्त टिकवून ठेवली आहे. त्यामुळे अनेक सभासद त्यांच्या नेतृत्वाविषयी समाधानी असल्याचे दिसते. मात्र वाढलेली पाणीपट्टी, मयत सभासदांच्या शेअर्स हस्तांतरणातील विलंब निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरू शकतात. ( इथे क्लिक करून विश्लेषण विडियो च्या माध्यमातून पहा )
कारखान्यातील कामगारांच्या पगारवाढीचा मुद्दाही नाराजीचा विषय होता. मात्र यंदा २५०० ते ३००० रुपयांची वाढ देत भोसले गटाने नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सेंद्रिय खत वितरणातील विलंबाबाबतही काही सभासद नाराजी व्यक्त करताना दिसतात.
सहानुभूती विरुद्ध प्रभावी यंत्रणा
गेल्या १० वर्षांपासून कृष्णा कारखान्यावर भोसले गटाची सत्ता आहे. सुरेश भोसले यांच्या काळात गाळप क्षमता वाढवण्यात आली आणि उच्चांकी दर देऊनही आर्थिक शिस्त राखण्यात आल्याचे मानले जाते. त्यामुळे कारखान्याच्या प्रशासनाबाबत सभासदांमध्ये सकारात्मक भावना असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, अविनाश मोहिते यांचा दीर्घकाळ टिकून असलेला जनसंपर्क आणि आजारपणामुळे निर्माण झालेली सहानुभूती ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. मात्र २०१० ते २०१५ मधील त्यांच्या सत्ताकाळातील अनेक नेते आज त्यांच्या सोबत नसल्याचे दिसते.
त्यामुळे यंदाची निवडणूक “सहानुभूती विरुद्ध प्रभावी निवडणूक यंत्रणा” अशी रंगताना दिसत आहे. भोसले गट विकासकामे, आर्थिक शिस्त आणि संघटनशक्तीच्या जोरावर मैदानात आहे; तर मोहिते गट सहानुभूती आणि वैयक्तिक संपर्काच्या आधारावर सत्तापालटाची आशा बाळगून आहे. अंतिम टप्प्यात कोणते समीकरण निर्णायक ठरणार, याकडे संपूर्ण सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Poll Pandit चे निरीक्षण
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सध्याच्या घडीला भोसले गटाचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. पण, हे समीकरण दिसते तेवढे सरळ नाही. कारण "बाहेरून येणाऱ्या विरोधापेक्षा सत्तेचे बळ असणाऱ्यांना आतून येणाऱ्या नाराजीने अधिक धक्का लावला आहे." अविनाश मोहिते यांच्यासमोर मोठा प्रश्न असा असेल की, निर्माण झालेली सहानुभूती प्रत्यक्ष मतदानात परिवर्तित होते का? तर भोसले गटासाठी खरी कसोटी असेल ती म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्यांमधील नाराजी नियंत्रणात ठेवण्याची हे सगळे असतांना..
कृष्णाकाठचा हा सत्तासंघर्ष निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंजक राहील.
लेखक — akshay awate | shreyash kharat वरिष्ठ व्यवस्थापक, Poll Pandit