राहुरीत चुरस: तनपुरे यांची भूमिका निर्णायक

राहुरीत चुरस: तनपुरे यांची भूमिका निर्णायक प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
राहुरी पोटनिवडणूक: पार्श्वभूमी आणि रिंगणातील उमेदवार
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सुरुवातीला भाजपचे अक्षय कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे प्राजक्त तनपुरे अशी थेट लढत अपेक्षित होती. मात्र भाजपने तनपुरे यांना माघार घ्यायला भाग पाडण्यात यश मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि वंचित बहुजन आघाडीने उमेदवार कायम ठेवले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली नाही. सध्या रिंगणात चार प्रमुख उमेदवार आहेत:
- अक्षय कर्डिले — भाजप (BJP)
- गोविंद मोकाटे — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
- रावसाहेब खेवरे — अपक्ष (माजी शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख)
- संतोष चोकले — वंचित बहुजन आघाडी (VBA)
अधिक माहितीसाठी पहा: Poll Pandit
राहुरीत चुरस: तनपुरे यांची भूमिका निर्णायक हे समजण्यासाठी आधी तीन तालुक्यांची भौगोलिक - राजकीय रचना समजून घेणे आवश्यक आहे.
१. अहिल्यानगर तालुका कर्डिले कुटुंबाचा बालेकिल्ला
अक्षय कर्डिले हे मतदारसंघातील अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर जिल्हा परिषद गटातून येतात. २०२४ विधानसभेत दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांना अहिल्यानगर तालुक्यातून तब्बल २१,७०० मतांची आघाडी मिळाली होती. २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला असताना देखील त्यांनी अहिल्यानगर तालुक्यातून १५,१७५ इतके मताधिक्य घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचा देखील तालुक्यात प्रभाव असून, त्यांनी कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. मात्र गोविंद मोकाटे देखील जेऊर गटातून येतात. अहिल्यानगर तालुक्यात त्यांचा सुद्धा जनसंपर्क आहे. त्यांच्या कन्या भाग्यश्री मोकाटे जेऊर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य राहिलेल्या आहेत. यामुळे या निवडणुकीत मोकाटे हे कर्डिले यांना त्यांच्या होम पीचवर थेट आव्हान देणार आहेत.
२. पाथर्डी तालुका भाजपचा परंपरागत गड
पाथर्डी तालुक्यातील मीरी आणि तिसगाव जिल्हा परिषद गटांमध्ये कर्डिले यांना मतदारांचा पाठिंबा राहिला आहे. भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी वर्ग, ऊस उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा गट या भागात सक्रीय असून त्यांचा अक्षय कर्डिले यांना पाठींबा आहे. यामुळे या निवडणुकीत देखील पाथर्डी तालुक्यातील मतदारांचा कल भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्याकडे अधिक असण्याची शक्यता आहे.
३. राहुरी तालुक्यातील मतदार निर्णायक
राहुरी तालुक्यात अंदाजे १,९५,९२६ मतदार आहेत. मतदारसंघातील उर्वरीत दोन तालुक्यांऐवजी सर्वाधिक मतदार हे राहुरी तालुक्यात आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहुरी तालुक्यात प्रभाव असून ते कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. कर्डिले यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे.
अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे हे शिवसेना (ठाकरे गट) चे माजी जिल्हाप्रमुख असून ते राहुरी तालुक्यातून येतात. प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार आणि गोविंद मोकाटे यांचा राहुरी तालुक्यात राहिलेला मर्यादित जनसंपर्क, यामुळे तालुक्यातील स्थानिक उमेदवार म्हणून खेवरे यांना राहुरीतील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
रावसाहेब खेवरे आणि मोकाटे यांच्यात राहुरी तालुक्यातील भाजपविरोधी मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा अक्षय कर्डिले यांना होऊ शकतो.
मतदान आकडेवारी: २०२४ लोकसभा आणि विधानसभा
प्राजक्त तनपुरे: मैदानाबाहेर, तरीही केंद्रस्थानी
माजी खासदार तथा आमदार प्रसाद तनपुरे यांनी उभारलेले संस्थांचे जाळे आणि प्राजक्त तनपुरे यांनी आमदार असताना राहुरी तालुक्यात केलेली विकासकामे यामुळे तालुक्यात त्यांचा मोठा जनाधार आहे.
२०२४ विधानसभा वगळता मागील दोन्ही निवडणुकांमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातून निर्णायक आघाडी घेतली आहे. सध्यस्थितीत त्यांची भूमिका स्पष्ट नसली तरी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात त्यांचे समर्थक कार्यकर्ते काय भूमिका घेतात, यावरच राहुरीचा निकाल अवलंबून असणार आहे.
राहुरीसह महाराष्ट्रातील सर्व निवडणूक डेटा आणि विश्लेषणासाठी #Instragram #Facebook #Twitter #Linkedin